
सातारा येथील श्री.छ. प्रतापसिंह महाराज सेवाधाम संस्थेतर्फे पर्यावरण संतुलन, मानसिक शारीरिक स्वास्थ, प्रदूषण निवारण यासाठी शनिवार 12 मार्च रोजी करंजे येथे सायंकाळी 6 वाजता सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी प.पू. डॉ. पुरुषोत्तमजी राजीमवाले ऊर्फ राजाभाऊ महाराज (परम सद्गुरु श्री गजानन महाराज अक्कलकोट यांचे नातू), श्री. बाळाप्पा महाराज मठ, गुरुमंदिर व अध्यक्ष विश्व फौंडेशन शिवपुरी, अक्कलकोट यांच्या पवित्र उपस्थितीत आणि श्री.छ. शिवाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक अग्निहोत्र होणार आहे. यावेळी दर्शन आणि प्रसादवाटप होणार आहे. तसेच त्यापूर्वी सकाळी 10 ते 2 यावेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिरही होणार आहे. त्यानिमित्त थोडक्यात माहिती……………..
याहीवर्षी 12 मार्च हा दिवस विश्व अग्निहोत्र दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अग्निहोत्र हे प्राचीन उपासना पध्दतीने सद्यःकाळात महत्व विशद करणारे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरु श्री गजानन महाराज अक्कलकोट यांच्या जीवनकार्यात 12 मार्च या दिवसाला आगळे महत्व आहे. 12 मार्च 1942 रोजी परमसद्गुरु गजानन महाराज यांना त्यांचे महाप्रतापी सद्गुरु भगवान परशुराम यांनी पूर्णाभिषेक केला. अर्थात त्रिपुरी महाविद्येची विधीवत, दीक्षा दिली गेली व परमसद्गुरु श्री हे नवयुगाचे पूर्णावतार म्हणून विधीवत दीक्षित झाले. गुरुदक्षिणा म्हणून पुढे श्री जी भगवान परमुरामांचे साक्षात उपस्थितीत विजयादशमी 1944 या दिवशी त्यांचे चरणावर विधीवत तुलसीदल व जल सोडून मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी अत्यंत कठीण प्रतिज्ञा केली. त्याचदिवशी सप्तश्लोकीव्दारे यज्ञ, दान, तप, कर्म व स्वाध्याय हा पंचसाधन मार्ग सर्व मानवासाठी खुला केला. अशाप्रकारे श्रींनी या घोर प्रतिज्ञेव्दारे एका क्रांतीकारक नवयुगाची सुरुवात केली.
आज अग्निहोत्र हा विषय व त्याचे महत्व विश्वाच्या कानाकोप-यात जाऊन पोचले आहे. अखिल मानवजातीच्या सर्वांगीण विकासासाठी दिल्या गेलेल्या वेदरुपी ज्ञानभंडारात अग्निहोत्र हे प्रत्येकास आवश्यक असणारे कर्म सांगितले गेले आहे. प्रामुख्याने हा उपासना मार्ग किंवा जीवन पध्दती गणला जात असली तरी त्याचे अन्य क्षेत्रातील उपायोग अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी अनेक व्यक्तीव्दारा अनुभवाचे आधारावर पडताळली गेली आहे.
श्रींनी दिलेल्या वेद प्रतिपादीत पंचसाधन मार्गावर आधारलेली जीवन पध्दती म्हणजेच अखिल विश्वासाठी असलेल्या मानवधर्म होय. हा मानवधर्म यज्ञ, ज्ञान, तप, कर्म व स्वाध्याय या पंचसाधनांनी युक्त आहे. याचे नित्य आचरण म्हणजेच अग्निहोत्र होय. सर्वात सोपा व सुटसुटीत असा शास्त्रीय मार्ग म्हणजे अग्निहोत्र. सुर्योदय व सुर्यास्त या निसर्गाच्या दोन महत्वाच्या संधीकाली प्रत्येक मानवाने प्रत्येक जीवनमात्राच्या कल्याणासाठी आचरण्याचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे अग्निहोत्र.
दररोज सुर्योदय व सुर्यास्ताच्या स्थानिक वेळी मातीच्या अथवा तांब्याच्या अर्थ पिरॅमिड सदृश्य पात्रात गोमयाचा अग्नि प्रज्वलित करुन त्यात गाईच्या तुपाने माखलेल्या तांदळाच्या दोन आहुती समंत्रक देणे. अग्निहोत्राचे मंत्र – सुर्यादय – सुर्याय स्वाहा इदं न मम (पहिली आहुती), प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम (दुसरी आहुती), सुर्यास्त – अग्नये स्वाहा अग्नये इदं न मम (पहिली आहुती) प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम (दुसरी आहुती).
प्रत्येक मंत्राचा उच्चार केल्यानंतर स्वाहा म्हटल्याबरोबर पाच बोटातील चिमटीमध्ये असणा-या गाईच्या तुपाने माखलेल्या अखंड तांदळाची आहुती अग्नित अर्पण करावी. दोन मंत्र व दोन आहुती दिल्यावर त्या जळून भस्म होईपर्यंत त्याच स्थानावर शांतपणे बसून रहावे.
अग्निहोत्राचे वैशिष्टय हे की, अग्निहोत्र हा हयातभर सायंप्रातः करावयाचा यज्ञ आहे. इतर सर्व याग आणि नैमित्तिक यज्ञ काही विशिष्ट मुदतीनंतर पूर्ण होतात. परंतु अग्निहोत्र अखंड सायंप्रातः चालते हा नित्य जीवनाचा भाग आहे व त्यामुळेच नित्य जीवन आकाराला येते. अग्निहोत्र विधी नवयुगाची तारक संजीवनी आहे. यावरुन वाटचाल करणारा समाज हा सुख-शांती-समृध्दीने परिपूर्ण असेल अशी निःसंदिग्ध ग्वाही परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांनी दिली आहे. याचा अनुभव आज जगभराचे आचरणकर्ते घेत आहेत.
जगभर विखुललेले अग्निहोत्र आचारणकर्ते व पंचसाधन मार्गांचे साधक गेली 50 वर्षे सेवावृत्तीने व विविध उपक्रमाव्दारे हा संदेश समाजामध्ये देत आहेत. मनशांती, वातावरणशुध्दी, शेतीत सकस व अधिक उत्पादन व्यसनमुक्ती व सुसंस्कार यासाठी कार्य करत आहेत. यावर काही तज्ञ व्यक्तींव्दारे परिक्षण करण्याचे काम सुरु आहे. पंचसाधन मार्गाचा मानवी जीवनावर होणारा अनुकुल व विधायक परिणाम आज जगभर अनुभवला जात आहे. म्हणूनच आज सर्व जगभर सर्व जाती, धर्म व पंथाचे लोक वाढत्या संख्येने व अग्निहोत्र जीवन पध्दतीचा स्विकार करत आहेत. अर्थातच आज ही काळाची गरज आहे.
हा संदेश जगभर झपाटयाने पसरला जावा ही काळाची गरज आहे. त्याला अनुसरुन वेद विज्ञान अनुसंधान संस्था, शिवपुरी अक्कलकोट यांनी विविध उपक्रम हाती घेऊन मानवजनांना अज्ञान व अंधकारातून प्रकाशाकडे सुखशांती व समृध्दीकडे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 12 मार्च हा विश्व अग्निहोत्र दिवस साजरा करणे या उपक्रमाचाच भाग आहे.





