समर्थ मंदिर चौक ते बोगदा या दरम्यान असणाऱ्या आणि वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्वर्गीय गजाभाऊ कुलकर्णी यांच्या घरासमोरील पूल व बोगद्याकडे जाणाऱ्या डॉक्टर फाटक यांच्या घरासमोरील पूल या दोन्ही पुलांच्या रुंदीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे हा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध झाल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी खासदार उदयनराजे भोसले व पालिका प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांचे विशेष आभार मानले आहेत
राजेशिर्के पत्रकारांशी बोलताना म्हणाले समर्थ मंदिर चौक ते बोगदा हा रस्ता शहराच्या पश्चिमेकडील अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत तीव्र उताराचा रस्ता आहे या मार्गावरील मंगळवार पेठेतील दोन्ही पुलांचे रुंदीकरण होणे गरजेचे होते गेल्या चार वर्षापासून या पुलांच्या रुंदीकरणासाठी मी सातत्याने प्रयत्नशील होतो . आमच्यात काम करण्याची धमक असल्यामुळेच खासदार उदयनराजे भोसले यांनी मला उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली होती मात्र या पुलांच्या रुंदीकरणाचे काम निघताच माजी नगराध्यक्ष माधवी कदम यांना पोटशूळ उठला आणि त्यांनी या ना त्या कारणाने या विकास कामांमध्ये व्यत्यय आणण्यास सुरुवात केली . विकास कामांमध्ये अडथळा नको व आघाडीत मतभेद नको म्हणून या त्रासाबद्दल आम्ही ब्र सुद्धा उच्चारला नाही
मात्र आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे समर्थ मंदिर चौकातून बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यातील या दोन पुलांसाठी 50 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे भाजपचे स्वर्गीय नेते गजाभाऊ कुलकर्णी यांच्या घरासमोरील पुल वाहतुकीसाठी रूंद करण्यात येणार असून त्याला 12 लाख रुपये खर्च येणार आहे . पुलाच्या दोन्ही कमानी या आर्च पद्धतीच्या असून त्याचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण होणार आहे तसा कार्यादेश प्रशासकांनी दिला असून या पुलाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे . तसेच सातारा पालिकेची जुन्या हद्दीची ओळख सांगणारा आणि बोगद्यातील वस्त्यांना जोडणाऱ्या दुसऱ्या पुलासाठी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या पुलाचे रुंदीकरण चार फुटांनी करण्यात येणार असून येथील वाहतुकीस सुलभता निर्माण करण्यात येणार आहे . इतर काही विशेष वाहतुक सुविधांची गरज पडल्यास तेरा लाखांचा विशेष निधी ठेवण्यात आला आहे .
बोगदा ते शेंद्रे ,बोगदा ते कास ,आणि बोगदा ते ग्रेड सेपरेटर या तीन रस्त्यांचे पुरेशा प्रमाणात रुंदीकरण करून पर्यटन वृद्धीच्या दृष्टीने सातारा पालिकेने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले सातारा शहराचे पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर या बोगद्याचे ड्रोन सर्वेक्षण करून वाहतुकीची तीव्रता तपासणे तेथे वाहतूक सुविधा देणे बोगद्याचे आतून आणि बाहेरून मजबुतीकरण करणे तसेच लगतच्या जागा शोधून तेथे ऐतिहासिक महापुरुषांची म्युरल्स उभे करणे जेणेकरून येथील पर्यटनाला संधी मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळतील असे पर्याय सुहास राजेशिर्के यांनी पत्रकारांशी बोलताना सुचवले







