साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळेच्या समोरील ओढ्यापर्यंत नकाशावर रस्ता ९ मीटर असताना काही ठिकाणी ९ तर काही ठिकाणी १० काही ठिकाणी १२ मीटर करण्याचा नगरपालिकेने घाट घातला आहे.काही बड्यांची अतिक्रमण वाचवण्यासाठी बड्या राजकारण्यांनी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना खाजगीत सुचना केल्या आहेत. रस्त्यालगत असलेले सर्व अतिक्रमण काढल्याशिवाय काम सुरू करु देणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी पालिकेच्या अधिकारी आणि ठेकेदाराला सांगितले.
कोणीही यावे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या की काम फत्ते करण्याचा पायंडा आता बंद व्हायला पाहिजे. साईबाबा मंदीर ते कल्याणी शाळेसमोरील ओढ्यापर्यंत रस्ताचे काम सुरू झाले आहे. मात्र अतिक्रमण न काढताच ठेकेदाराने सुरू केलेल्या कामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला तर पालिकेचे अधिकाऱ्यांनी रेटून काम सुरू केले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सरसकट अतिक्रमण झाले आहे. तरीही त्याबाबत कारवाई करून रस्त्याचे काम सुरू करायला हवे होते. ते न करता निवडणूक तोंडावर आली की कामाचा सपाटा लावल्याने या रस्त्याचे काम लवकर करण्यासाठी ठेकेदाराला पालिकेतून सुचना दिल्या आहेत.
मात्र सातारा हौसिंग सोसायटीच्या बड्या सभासदांनी मोठ्या प्रमाणावर केलेले अतिक्रमण न काढण्यासाठी बड्या नेत्यांनी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांनी आमिष दाखवून सुचना केल्याची चर्चा गोडोली परिसरात सुरू आहे.यात कुठे कुठे ७,९ ,१० ,१२ मीटर रस्त्याची रुंदी का ठेवली जाणार असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांना कलता येईना, यावरून निवडणूकीच्या तोंडावर मतासाठी अतिक्रमणाला अभय देण्याचा प्रकार असल्याचा आरोप सुशांत मोरे यांनी केला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला अजून रस्त्याच्या हद्दी निश्चित करताच अधिकारी आणि ठेकेदाराने उतावळेपणा दाखवत काम सुरू केले आहे. याबाबत स्थानिकांनी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांना नकाशा,कागदपत्रे दाखवून पालिकेने बड्यिंची अतिक्रमण वाचविण्यासाठी सामान्यांना धाक दाखवून रस्ता करण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात “आधी सरसकट अतिक्रमण काढा नंतर नियमानुसार रस्त्याचे काम करा,”असे सांगून सदरचे काम थांबविण्यास भाग पाडले.
चौकट-१
आरडाओरडा झाला की पालिकेची टीम झाली गोळा
नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी मुदत संपली की प्रशासनाच्या हाती कारभार जाण्याअगोदर कामांची उरका उरकीची घाई लावली आहे. गोडोलीतील रस्त्याच्या अंतरावर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात एकवाक्यता नसल्याचे समोर आले आहे. रस्त्याचे काम थांबवलेल्याची वार्ता कळताच उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगरसेवक अँड. डि.जी.बनकर,बांधकाम अभियंता चिद्रे,अभियंता चव्हाण, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांच्या सह काही अधिकारी गोडोलीत गोळा झाले. यावेळी सुशांत मोरे यांच्या सह स्थानिकांनी आरडा ओरडा करत कागदपत्रे,नकाशा आणि केलेल्या अतिक्रमणाचे पुरावा देत चुकीच्या कामाचा पोलखोल केला. यावेळी पालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सर्व समजून घेत काम थांबवले.’आधी अतिक्रमण काढून नंतर रस्त्याचे करू,’असा स्थानिकांना दिलासा दिला.
चौकट -२
‘नाही तर न्यायालयात दाद मागणार’
माझ्या खाजगी जागेवर तब्बल३,मीटर पेक्षा जास्त रस्त्याची हद्द पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली आहे. नुकताच सरकारी मोजणी करून केलेल्या हद्दीवर कंपाऊंड केले होते. ते कोणतीही सुचना नाही की नोटीस बजावली नाही. परस्पर हद्दीवरील केलेले कंपाऊंड पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काढले आहे. रस्ता करा मात्र माझ्या खाजगी जागेतून नको. माझ्या जागेतून रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर न्यायालयात दाद मागून संबंधितांना वठणीवर आणणार असल्याचे भद्रकाली उद्योग समूहाचे विद्याधर कांबळी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावले.
चौकट-३
समन्वय नसल्याने एकवाक्यता नाही
“गोडोलीतील रस्त्याच्या अंतरावर तफावत, नकाशा असताना त्याप्रमाणे रस्ता धरला नाही, अतिक्रमण वाचवण्यासाठी मनमानी करत नगरपालिकेच्या प्रशासनाच्या शहर विकास, बांधकाम, अतिक्रमण विभागात एकवाक्यता नाही. या विभागात समन्वय नसल्याने होण्याआधीच रस्त्याची वाट लावली आहे.नियमाप्रमाणे योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारे सक्षम अधिकारी नसल्याने साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी समस्या निर्माण होतात. हे पुन्हा गोडोलीतील रस्त्याच्या कामातून समोर आले आहे,”असे सुशांत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.







